मुंबई : संजय लीला भंसाळी यांची पहिली मराठी निर्मिती असलेला, अभिनेता स्वप्निल जोशी, अंजना सुखानी स्टारर लाल इश्क आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा कसा आहे हे घ्या जाणून..
यश पटवर्धन आणि जान्हवी या दोन व्यक्तिरेखांची ही प्रेम कहाणी आहे.. पण या प्रेम कहाणीत अनेक ट्विस्ट अँन्ड टर्न्स आहेत. लाल इश्क हा एक रोमॅन्टिक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. यश पटवर्धन जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता स्वप्निल जोशीनं, एक मोठा नट आहे, त्याच्या एका आगामी नाटकासाठी एका हॉटेलमध्ये तालमी सुरु आहेत. इथेच त्याची भेट होते जान्हवीशी. जान्हवीला बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. मग या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होते. याच दरम्यान नाटकाचा निर्माता पोद्दारचा खून होतो. या खूनाचा आरोप यश पटवर्धनसह अनेकांवर होतो. शेवटी काय घडतं हाच खरा सस्पेन्स आहे.
दिग्दर्शक स्वप्ना वाघमारे जोशी यांनी सिनेमाला बरी ट्रीटमेन्ट दिली आहे. एकीकडे लव्ह स्टोरीची हाताळणी करणं आणि त्यातच सस्पेन्स थ्रिलरचा फ्लेवर अॅड करणं हे सोपं नाही. पण सिनेमाच्या दिग्दर्शिकेनं हा प्रयत्न केलाय. सिनेमात एक सोडून तीन मर्डर होतात आणि या सगळ्या मर्डर मिस्ट्रीचा पाठ पुरावा करतो इंन्पेक्टर अजिंक्य रणदिवे आणि त्यांची सहकारी इंन्पेक्टर निंबाळकर. हे दोघं सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ आरोपींचे जबाबच नोंदवत असतात. जे पाहणं एका ठराविक टाइम स्पॅननंतर खरंच बोरिंग वाटतं. संशयाची सुई सारखी सारखी स्वप्निलनं साकारलेल्या यश पटवर्धनवरच येते. हे पाहिल्यानंतर कुठेतरी मनात पक्कं होतं की राव खूनी कोणीही असलातरी मर्डर यश पटवर्धननं केलाच नाहीये.. प्रेक्षकांमध्ये ती उत्सुकता निर्माण करण्यासाठी खरंतर स्र्किनप्लेमध्ये नको नको ते प्रयोग करण्यात आलेत. शेवटी हा ड्रामा कधी संपतो याची वाट पाहण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच उरत नाही. लाल इश्क या सिनेमात प्रेक्षकांना होल्ड करण्याची क्षमताच दिसत नाही.
लाल ईश्क या सिनेमात स्वप्निल आणि अंजनाची जोडी तुम्हाला पहायला मिळते. मात्र या दोघांमधली केमिस्ट्री मात्र अजिबात पटत नाही. ते इमोशन्स क्रिएट करण्यात सिनेमा फेल ठरतो. अभिनेता स्वप्निल जोशीला या सिनेमातही दोन अभिनेत्रीचं प्रेम लाभलंय. स्वप्निलनं साकारलेली यश पटवर्धनही व्यक्तिरेखा छान झालीये. मात्र अंजनानं साकारलेली जान्हवी हवी तितकी परिणामकारक जाणवत नाही. अभिनेता जयवंत वाडकर, कमलेश सावंत यांनी आपआपल्या भूमिका छान पार पाडल्या आहेत. सिनेमागृहातून बाहेर पडल्यावर तुम्ही हा एकच सिनेमा दोनदा पाहिलाय की काय अशी एक मिक्स्ड फीलींग तुम्हाला सिनेमा पाहिल्यानंतर जाणवेल यात शंका नाही. जाता जाता एवढच म्हणेन की, इश्क से डर नही लगता साब, लाल इश्कसे लगता है.
तुम्ही जर ,स्वप्निल जोशीचे हार्ड कोर फॅन आहात तर एकदा लाल इश्क पहायला हरकत नाही..
२ स्टार्स