अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!

रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 8, 2015, 03:17 PM IST
अपघात सलमाननं केला पण, उद्ध्वस्त झालं रवींद्रचं आयुष्य!  title=

मुंबई : बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.

रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर... 
याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.
 
रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष... 
रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती. 

रविंद्रवरचा दबाव वाढला... 
यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला... 
 
 


रविंद्रला अटक

पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती... 
सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला. 

कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र... 
मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही... 

साक्ष बदलण्यासाठी दबाव... 
रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.  

कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...
सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली. 

भीक मागण्याची वेळ... 
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.


रविंद्रचे अखेरचे काही क्षण... 

दारूचं व्यसन... आणि क्षयरोग
२००७ मध्ये तो शिवडीच्या पालिका हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं. 

न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली... 
रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली... सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात रविंद्रच्या मृत्यूनंतरही त्याची अगोदर नोंदवलेली साक्ष खूप महत्त्वाची ठरली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.