मुंबई : सध्याचे किंवा आधीचे चित्रपट पाहिले तर अभिनेत्री आणि अभिनेता यांचा एक साचा होता. तो साचा मला मान्य नाही. त्यामुळे 'सैराट' या सिनेमात नायक-नायिका यांच्यात विरोधाभास दाखविण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्याही पट्टीत मोजमाप करण्याची गरज नाही. जी तुमच्यापुढे अभिनेत्री आणि अभिनेता यांची इमेज होती तिला ब्रेक करण्याचा प्रयत्न 'सैराट'मधून केलाय, अशी कबुली दिग्दर्शक नागराज मुंजळे दिली.
कलाकाराने सीनचा विचार करावा. वेंधळा हिरो मराठीत खूप काळ दाखविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला कोणताही एक साचा नको होता.
कोणतेही मोजमाप नको. जे मीटरमध्ये मोजायचे होते ते लीटरमध्ये मोजले जातेय. तर लीटरमध्ये मोजायचे ते फूटपट्टीत मोजले जाते, असा काहीसा विचित्र प्रकार सुरु होता. मात्र, माझ्या मनात आलं ते दाखवलं.
अनेकवेळा सिनेमात अभिनेता किंवा हिरो हा रांगडा गडी दाखविण्यात येतो. तर अभिनेत्री सुंदर असावी ही संकल्पना होती. ती मला मान्य नाही. महिलांना नेहमी दुय्यम स्थान का? हा प्रश्न मला सतावत होता. त्यामुळे मी 'सैराट'मध्ये अभिनेत्री बरोबर उलट दाखविण्याचा प्रयत्न केलाय. तर हिरोला कोमल, नाजूक, लाजरा दाखविण्याचा प्रयत्न केला. हे लोकांना भावलंय, असे नागराज यांनी आर्ची आणि परशा व्यक्तिरेखाबद्दल सांगितले.
परशा हा हळवा दाखविलाय. तर आर्ची ही धाडशी. बुलेट, ट्रक्टर चालविणारी घोड्यावर बसणारी आणि थेट धाडसाने विहीर पोहोण्यासाठी उडी मारणारी दाखवली. जे आजर्पंयत हिरो करीत होता ते आता अभिनेत्री करुन दाखवले. महिलांना कमी लेखू नका, हाच यातून संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, असे नागराज यांनी एका मराठी वाहिनीवर बोलताना सांगितले.
सिनेमात मला मध्यान्त मान्य नाही. जर थिएटर मालकांनी सलग सिनेमा करण्याचे सांगितले असते तर मी तसा सिनेमा केला असता. सलग सिनेमा करण्यास मला आवडेल. त्यामुळे सुरुवातीला एक भाग आणि मध्यान्तनंतर दुसरा भाग असं माझ्या सिनेमात नसते. ते अपघाताने वाटते. स्टोरीनुसार हा सिनेमा आहे, असे नागराज यांनी सांगितले.
सध्या माझं कौतुक होत आहे. यातच खूप आनंद आहे. त्याला तुझी कोणी व्हॅलेटाईन आहे का? असं विचारले असता, खूप आहेत. मात्र, आयुष्याच्या कमरेत हात घालून नाचत आहे. तेच माझे व्हॅलेटाईन आहे. आजूबाजूचे लोक माझ्या प्रेमात आहेत. यातच खूप आहे, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.