नमस्कार,
तुमचा बंड्या, बंडोजीराव आपल्या भेटीला आलंय, भेटीगाठी सध्या महत्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्राचं राजकारण खूपचं तापलंय, महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असले, तरी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या मुद्यावर संयुक्त लढत असल्याचं चित्र आहे.
कालपर्यंत टेलव्हिजनवरच्या जाहिराती, सोशल नेटवर्किंगवरचे जोक, थट्टा-मस्करी आता दोन राज्यातील अस्मितेच्या प्रश्नांवर येऊन ठेपलीय.
दिल्लीतला नेता महाराष्ट्रातील मनं जिंकण्याच्या मनसुब्याने दाखल झाला आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय कुरूक्षेत्रात हा नेता चौफेर घेरला गेलाय.
सहसा कुणावरही न बरसणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांची तुलना नेहमी राज ठाकरेंशी होते, मात्र या दोन भावांमधील तुलना आज होतांना दिसत नाहीय, वातावरण तर इथपर्यंत आलंय की, काँग्रेस-राष्ट्रवादीवरची टीकेची झोडही आता खाली बसलीय.
मात्र मवाळ म्हटले जाणारे उद्धव ठाकरे आज चांगलेच कडाडले आहेत, ‘दिल्लीवरुन महाराष्ट्र जिंकायला अफझल खानाची फौज आली आहे, त्यांना महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत’, यावरून शिवसेनेचा रोख भाजपकडे आणखी तीव्र होतांना दिसतोय.
काल राज ठाकरे यांनी भांडुपच्या सभेत पहिल्यांदा भाजप आणि मोदींवर जोरदार आसूड ओढले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा एक-एक पाढा वाचला.
शिवसेना – भाजपची गेल्या 25 वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेना एकाकी पडलीय? अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळतेय. पण, यावर पवारांनी गुगली टाकलीय.
‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय?’ असा उलट सवाल पत्रकारांना शरद पवारांनी केल्यानंतर, पवारांना नेमकं काय म्हणायचंय याचे अनेक अर्थ लावायला सुरूवात झाली आहे. एकंदरीत शिवसेनेचं पारडं जड आहे असं शिवसैनिकांनी म्हटलं तर त्यांच्या बोलण्याला हरकत घेण्यास आता जागा उरलेली नाही.
कारण धुरंदर राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या पवारांनी कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय? असा सवाल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
शिवसेनेचा जुना मित्र पक्ष मात्र यामुळे आणखीन गोंधळात पडलाय. यामुळे निवडणुकीनंतर आणखी आधीचे मित्र पक्ष जवळ येतील हे समीकरण आता न जुळणारं आहे, सर्वांना नवे मित्र असतील, ब्रेकअप झालाय, आता पॅचअप भविष्यात होण्याची आशा मात्र मावळलीय.
एवढं मात्र नक्की महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातला, तर महाराष्ट्रातील जनता एक होते, मग कुणालाही वाटत असलं की महाराष्ट्रात जिंकू, तर त्याचं काय होतं, हे सांगायला इतिहास साक्षी आहे.
शिवसेनेचे डाव सरळ पडतायत, सर्वच मैदानात शिवसेनेची घौडदौड सुरू आहे. कालचे शत्रू शिवसेनेला शत्रूचा वेध घेण्यासाठी मैदान मोकळं सोडतायत हे नक्की.
आपण बंड्या म्हणजे बंडोजीराव जे बघितलं ते सांगितलं, कारण माझ्या सारख्या सामान्य माणसाला काय, कानावर आलं ते ऐकायचं, मनाला पटलं ते सांगायचं..
चला नमस्कार, उद्या भेटू पुन्हा...!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.