www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
खासगी बसेसमधली २ बाय २ स्लीपर कोचची तरतूद महाराष्ट्र मोटार वाहन नियमात नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे संपूर्ण राज्यभर चालणारी स्लीपर सेवा अवैध असल्याचं स्पष्ट झालंय. या नियमांची माहिती असूनही अधिकारी मात्र तपासणीनंतर कारवाई करणार असल्याचं सांगत आहेत.
आरामात प्रवास करण्यासाठी स्लीपर कोच किंवा खासगी बसला अनेक जण पसंती देत असतात. आरामात प्रवासाची ऑफर देणारी स्लीपर कोच सेवा अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमा मध्ये २ बाय २ स्लीपर कोच ची तरतूदच नाही. ५ फूट रुंदीची व्यवस्था असलेल्या बसेससाठी २ बाय १ ची परवानगी असतांना खासगी बस मालक २ बाय २ स्लीपर सेवेचा अवैध रित्या वापर करत आहेत. सरकार आरटीओ अधिकारी यांच्या डोळ्यादेखत हा सारा प्रकार सुरु आहे.
संपूर्ण राज्यात अशा जवळपास १,५०० खाजीगी बस रोज रस्त्यावर धावत असून स्लीपरच्या नावावर प्रवाशांकडून भरमसाठ पैसे वसूल करतायत. विशेष म्हणजे ही वाहतूक अवैध असल्याचं परिवहन अधिकारीही मान्य करतात. या प्रकरणी नव्याने तपासणी करून कारवाई करण्याची गरज असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सरकारी अधिकारी आणि राज्य सरकारला कल्पना असूनही स्लीपर बसेसची अवैध वाहतूक सर्रास सुरु आहे. ही वाहतूक रोखण्यासाठी सरकार कसला मुहुर्त शोधत आहेत, हा प्रश्न कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.