कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहीर झालाय. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान २८ जूनला होणार आहे तर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान यंदा २७ जूनला होणार आहे.
कितीही अडचणी आल्या, कसलीही संकट आली तरी सर्वांना एकाच सूत्रात बांधणारा राज्याचा धार्मिक सोहळा अर्थात आनंदवारी… ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. परंपरेनुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच २८ जूनला ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच प्रस्थान होणार आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम आळंदीमध्येच असणार आहे. यंदा नव्यानेच बांधलेल्या दर्शन बारी मंडपात म्हणजेच जुन्या गांधी वाड्यात असणार आहे.
- २९ जून आणि ३० जूनला पालखी पुण्यात असेल.
- १ आणि २ जुलैला सासवडमध्ये मुक्काम असणार आहे.
- ३ जुलैला जेजुरीमध्ये आणि ४ जुलैला वाल्हे इथे मुक्काम होणार आहे.
- ५ जुलैला लोणंदमध्ये पालखीचा मुक्काम असेल. यंदा लोणंदमध्ये एकच मुक्काम असणार आहे.
- ६ जुलैला तरड गावमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे.
- ७ जुलैला पालखी फलटण विमानतळावर मुक्कामाला असेल.
- ८ जुलैला बरडला आणि
- नातेपुते इथं ९ जुलैला पालखी पोहोचणार आहे.
- त्यानंतर पालखीचा १० जुलैचा मुक्काम माळशिरस तर
- ११ जुलैचा मुक्काम वेळापूर इथे असणारे.
- १२ जुलैला पालखी भंडीशेगाव
- तर वाखरीमध्ये १३ जुलैला पालखीचा मुक्काम असेल.
- १४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचेल.
- १५ तारखेला आषाढीचा एकादशी आहे.
पालखी सोहळ्यात परंपरेनुसार रिंगण सोहळे होणार आहेत. नीरा स्नान ५ जुलै रोजी पार पडेल. पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथे ६ जुलैला होईल. पहिलं गोल रिंगण १० जुलैला सदाशिव नगर इथे तर ११ जुलैला खुडूस फाट्याला दुसरं गोल रिंगण तर १२ जुलैला ठाकूर बुवांच्या समाधीजवळ तिसरं गोल रिंगण होणार आहे. १३ जुलैला वाखरी जवळ दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगणसोहळा होणार आहे. १४ जुलैला वीसबावी जवळ तिसऱ्या उभ्या रिंगणाचा सोहळा रंगणार आहे.
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला म्हणजेच २७ जूनला मुख्य देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहूतच इनामदारसाहेब वाडा इथे असेल.
- पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होऊन आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात २८ जूनला मुक्कामी येईल.
- २९ आणि ३० जूनला पालखी पुण्यात मुक्कामी असेल.
- १ जुलैला पालखी लोणी काळभोरला तर २ जुलैला यवत इथल्या श्री भैरवनाथ मंदिरात मुक्काम करणार आहे.
- ३ जुलैला वरवंड मधल्या श्री विठ्ठल मंदिरात,
- तर ४ जुलैला उंडवडी गवळ्यांची इथे पालखीचा मुक्काम असेल.
- ५ जुलैला पालखी बारामतीतील सांस्कृतिक भवनात मुक्कामी असेल.
- पालखीचा ६ जुलैला सणसर मुक्काम असणार आहे.
- ७ जुलैला पालखी सणसरहून बेलवडी, शेळगाव फाटामार्गे निमगाव केतकी इथे मुक्कामी जाईल. बेलवडीत पहिले गोल रिंगण होईल.
- ८ जुलैला पालखीचा इंदापूर मुक्काम असेल. ८ जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल.
- ९ जुलैला पालखीचा सराटीत
- तर १० जुलैला पालखी अकलूज मुक्कामी जाईल. त्याच दिवशी माने विद्यालयाच्या पटांगणात तिसरं गोल रिंगण होईल.
- ११ जुलैला पालखीचं माळीनगर इथे पहिलं उभं रिंगण होऊन पालखी बोरगावमध्ये मुक्कामी जाईल.
- १२ जुलैला सोहळा पिराची कुरोली मुक्कामाला असेल.. आणि त्याच दिवशी तोंडले बोंडले इथे धावा असणार आहे.
- १३ जुलैला वाखरीत मुक्काम करेल. तिथंच बाजीराव विहीर इथं दुसरे उभे रिंगण होईल.
- १४ जुलैला पालखी सोहळ्यात वाखरीजवळ अभंग आरती आणि तिसरं उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा पंढरपूरमध्ये पोचणार आहे.
- १५ जुलैला आषाढीचा सोहळा रंगणार आहे.
वारीच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वारीचा साद्यंत वृत्तांत आम्ही सालाबादप्रमाणे आमच्या आनंदवारी या विशेष कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे आमच्या संपूर्ण राज्याला विठूरायाच्या भक्तीत लीन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आनंदवारी... तेव्हा तयार राहा... आणि आमच्यासोबत सामीलही व्हा...