औरंगाबाद : औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.
शहरात आपली ताकद वाढली असून महापौर आपलाच होणार असा दावा भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केलाय. शिवसेना आणि भाजपनं अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घ्यावं,असा त्यांचा प्रस्ताव आहे. अपक्षांची भाजपलाच साथ असल्याचंही सावे म्हणाले.
औरंगाबादेत युती काठावर पास झालीय. बहुमताचा आकडा ५७ असताना युतीनं ५१ जागा मिळवल्या. त्यात शिवसेनेनं भाजपपेक्षा काही जागा जास्तच मिळवल्या. तर भाजपनं यंदा २२ जागा जिंकत २०१०च्या तुलनेत मोठी आघाडी घेतली. आणि त्याच जोरावर भाजपनं महापौरपदावर दावा केलाय.
भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष बंडखोर आणि काही अपक्ष आपल्याच सोबत असल्याचा दावा करतायत. शिवसेना २८ जागा अधिक ४ बंडखोर आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. तर भाजप २२ जागा अधिक ६ बंडखोर आणि अपक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा करतायत. या दाव्याच्या जोरावर २०१० च्या तुलनेत भाजप १५ जागांवरुन थेट ३०जागांच्या आसपास जाणारेय. त्यामुळे महापौर भाजपचाच असणार असं भाजप नेते सांगतात.
भाजप आमदार अतुल सावे यांनी महापौर पदावर दावा केला आहे. तर शिवसेना मात्र हे मान्य करायला तयार नाही. राज्यातल्या फार्म्युल्यानुसार ज्याचं जास्त संख्याबळ त्यांचा महापौर असं स्थानिक शिवसेना नेते सांगतायत. तर वरिष्ठ शिवसेना नेते सध्या यावर बोलण्यास नकार देतायत.
ज्यांच्या जास्त जागा आहेत, त्यांचा महापौर होणार, असे शिवसेनेचे स्थानिक नेते प्रदीप जैस्वाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत खासदार चंद्रकांत खैरै यांनी म्हटलं आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे निर्णय़ घेतील .
अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर युती करण्यात यश आलं होतं. मात्र आता पुन्हा महापौरपदाच्या मागणीवरून युतीच्या नेत्यांत घमासान होण्याची शक्यताय. त्यामुळं महापालिका निवडणुकांप्रमाणेच महापौरांची निवडणूकही चांगलीच गाजणार यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.