औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेवर सलग सहाव्यांदा शिवसेना भगवा फडकवण्याच्या तयारीत आहे. सुरूवातीला जोरदार मुसंडी मारणा-या शिवसेना-भाजपच्या युतीचा वारू ५१ जागांवर थांबला. त्यामुळं युती स्पष्ट बहुमतापासून सहा जागा दूर राहिली.
शिवसेनेला २९ तर भाजपला २२ जागांवर विजय मिळालाय. भाजपचे चार तर शिवसेनेचे दोन बंडखोर निवडून आले आहेत. त्यामुळं बंडखोरांना पक्षात पुन्हा घेण्याच्या दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात शिवसेना नेते रामदास कदम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
सर्वांचं लक्ष लागलेल्या एमआयएमनं २५ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारलीय. तर बसपानंही पाच जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलाय. दोन्ही पक्षांची ताकद कमालीची घटल्याचं दिसून आलंय.
एमआयएमच्या वाढत्या प्रभावामुळंच काँग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण झाल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे नवी मुंबईत गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्ता राबवणा-या राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांचेच वर्चस्व पुन्हा सिद्ध झालंय.
राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी अपक्षांच्या मदतीनं नाईक आपला सत्तेचा झेंडा फडकवत ठेवतील असं चित्र दिसतंय. नवी मुंबईत राष्ट्रवादीने ५२ जागा जिंकल्या आहेत तर शिवसेना भाजप-शिवसेनेनं युती केली खरी मात्र नाईक यांना रोखण्यात त्यांना अपयश आलंय. नवी मुंबईत शिवसेनेच्या जागा दुपटीनं वाढलेल्या आहेत. तर भाजपच्याही जागा वाढल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.