विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: समाजासाठी रक्त सळसळतंय... काही तरी पोटतिडकीनं करावसं वाटतंय... पोलीस दलात भर्ती व्हावसं वाटतंय... तर मग या औरंगाबाद पोलीस दलात... तुमचं स्वागत आहे... औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी अशी भूमिका घेतलीय. या भन्नाट योजनेद्वारे पोलिसांनी औरंगाबादमधल्या तरुणाईला साद घातलीय.
पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो रुबाबदारपणा...अधिकारवाणी... त्यांची जरब... अशा इमेजमुळे अनेकांना पोलीस होण्याची इच्छा असते. पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं नाही. मात्र इच्छा असेल आणि तुम्ही तरुण असाल तर औरंगाबादमध्ये तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. औरंगाबाद पोलिसांनी तरुणाईला साद घालत सोबत काम करण्याचं आवाहन केलंय. वरिष्ठ पोलीस सुरक्षा अधिकारी आणि कनिष्ठ पोलीस सुरक्षा सहकारी असे दोन वर्ग तयार करण्यात आलेत. काम करण्याचा हा कालावधी एक महिन्याचा असेल आणि त्यासाठी पदवीधर किंवा पदवीचं शिक्षण सुरू असलेले तरुण पात्र असतील. एका मुलाखतीद्वारे तुमची निवड होऊ शकते. सोबत काम करताना तरुणांचे, समाजाचे अनेक गैरसमज दूर होतील असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यासाठी पोलिसांनी तरुणाईला कनेक्ट होण्याचं आवाहन केलंय.
तर वाहतूक वॉर्डन ही दुसरी योजनाही पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्यानं सुरू केलीय. त्यात १८ ते ५० वयोगटातील कुणीही अर्ज करु शकतं. त्यासाठी अटी केवळ दोन... एक म्हणजे थोडसं शिक्षण असावं आणि प्रकृती धडधाकट असावी... त्यांच्या सोयीनुसार वाहतूक नियंत्रणासाठी त्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात येणार आहे. यातून वाहतूक आणि नागरिकांनाही शिस्त लागण्यास मदत होईल असा आयुक्तांना विश्वास आहे.
पोलिसांचा हा उपक्रम नागरिक आणि पोलिसांना जवळ आणणारा आहे म्हणूनच औरंगाबाद पोलिसांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद तसंच स्वागतार्ह आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.