नाशिक : नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर इंजिनियर सतीश चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत विभागाने तब्बल अडीच वर्षांनंतर विशेष न्यायालयात दोन हजार पानी आरोप दाखल केला आहे.
चिखलीकर यांना ३० एप्रिल २०१३ रोजी ठेकेदाराकडून बावीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्रंबकेश्वर उपविभागाचे शाखा अभियंता जगदीश वाघ यांच्या मार्फत ही रक्कम घेण्यात आली होती. रायते ते काकडवळण या रस्त्याच्या कामाचा तीन लाख ८६ हजार ९१६ रुपयांचा धनादेश देण्याकरिता ठेकेदाराकडून सहा टक्के अर्थात बावीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
यानंतर लाचलुचपत विभागाने चौकशी केली असता चिखलीकर यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या विविध बँकामधील लॉकरमध्ये रोख रक्कम, सोने, चांदी, स्थावर आणि जंगम मालमत्ता अशी एकूण चौदा कोटीची मालमत्ता जप्त केली होती.
ही सर्व मालमत्ता चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचं निष्पन्न झालय. वर्षाकाठी सरासरी एक कोटी इतकी अवैध कमाई केल्याचा चिखलीकरवर आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.