देवेंद्र सरकार रेशनिंग माफियांच्या मुसक्या आवळणार

देवेंद्र फडणवीस सरकारने रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे.

Updated: May 4, 2015, 09:12 AM IST
देवेंद्र सरकार रेशनिंग माफियांच्या मुसक्या आवळणार title=

अहमदनगर : देवेंद्र फडणवीस सरकारने रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे.

"समाजातील गोरगरीब, गरजू आणि पात्र जनता अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभ नगरमधून होत आहे. हा उपक्रम सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,‘‘ अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिलीय. 

भविष्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शहरातील ९१ स्वस्त धान्य दुकानांतून ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 

अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाद्वारे शहरात बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवितरण प्रणालीचे उद्‌घाटन आज बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी या वेळी उपस्थित होते. 

बापट पुढे बोलतांना म्हणाले, "जनतेला स्वस्त धान्य दुकानांतून धान्य मिळाले पाहिजे. त्यासाठी अन्नधान्य वितरक दुकानदार, वाहतूकदार आणि संबंधित अधिकारी यांचे योगदान महत्त्वाचे असते. वितरण यंत्रणेतील बहुतांश लोक त्यासाठी प्रामाणिक काम करतात. मात्र, भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे या चांगल्या योजनेला गालबोट लागते. अशा लोकांवर यापुढे सरकार कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार आहे. तशी कायद्यातच तरतूद होईल.‘‘ 

स्वस्त धान्य दुकानदारांना कमिशन वाढवून देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. बायोमेट्रिक प्रणालीसाठी शंभर कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.