डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

डोंबिवलीत आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार आहे. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 

Updated: Feb 3, 2017, 09:59 AM IST
डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात  title=

डोंबिवली : डोंबिवलीत आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार आहे. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 

अनेक साहित्य प्रेमी, वाचक, लेखक मंडळींसह संमेलनाला 11 ते 12 हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन स्थळी आणि मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. 

265 पोलिसांसह 500 स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत. गणेश मंदिर संस्थान ते पु. भा. भावे साहित्य नगरी अर्थात संमेलन स्थळापर्यंत आज सकाळी ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली आहे. 

त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर सव्वा दहा वाजता मावळते संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडेल. 

शं. ना. नवरे सभामंडपाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित राहणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल. आयोजकांनी संमेलन परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणलाय.