Indian Railway : रेल्वे प्रवास... भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक भाग अगदी सहजपणे जोडला गेला. किमान वेळात कमाल अंतर कापत होणारा रेल्वेप्रवास अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरतो. भारतात अनेकांसाठीच प्रवासाचं प्रमुख साधन असणाऱ्या याच रेल्वेच्या माध्यमातून दर दिवशी कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करतात.
प्रवासादरम्यान अनेकदा काही नवे आणि काही अनपेक्षित अनुभव अनेकांनाच येतात. पण, प्रत्येक वेळी हे अनुभव चांगलेच असतील असं नाही. अशाच काहीशा विचित्र अनुभवाचा किंबहुना एका किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये रेल्वेप्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या चहासंदर्भातच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक इसम रेल्वे कोचमध्ये चहा विकण्यासाठी आणणारी किटली चक्क शौचालयातील नळाच्या पाण्यानं धुवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
रेल्वेमध्ये सुरु असणारा हा घाणेरडा प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारता त्याच सेवांच्या नावावर हा असा प्रकार सुरू असेल तर याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे असा सूर नेटकरी आणि रेल्वे प्रवाशांनी आळवला आहे. हा व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की, चहाप्रेमींनाही रेल्वेप्रवासादरम्यान चहा पिताना दोनदा विचार करावा लागेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.
रेल्वे प्रवासादरम्यान घडलेला हा प्रकार नवी बाब नसून, यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना समोर आल्यानं प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाचा कारभार यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन बेजबाबदार असल्याचं इथं स्पष्ट होत असल्यानं अनेकांनीच तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.