फडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत

अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी... 

Updated: Nov 18, 2014, 11:46 AM IST
फडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत title=

अलिबाग : अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी... 

अलिबाग इथं राष्ट्रवादीचं दोन दिवसांचं चिंतन शिबीर भरलंय. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथं जमा झालेत. त्यांच्यासमोर बोलताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे भाष्य केलंय. 

'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही... निवडणुका केव्हाही होऊ शकतात, तयारीला लागा' असे आदेशच पवारांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलेत. 

यंदाचा निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला... १४८ जागा मिळवण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रवादीला खरं तर राष्ट्रवादीला ६० ते ७० जागांची आवश्यकता होती... मात्र, केवळ ४१ जागा मिळाल्या, अशी खंतही पवारांनी यावेळी व्यक्त केली. 

विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादी तटस्थ होती, असा उल्लेख पवारांनी आवर्जुन आपल्या भाषणात केलाय. त्यामुळे, फडणवीस सरकारनं आमचा पाठिंबा गृहीत धरू नये... सरकार टिकवण्याचा मक्ता राष्ट्रवादीनं घेतलेला नाही, असा संदेशच त्यांनी एकप्रकारे दिलाय.
भाजप सरकारनं जनताविरोधी काम केलं तर आमचा कायम विरोधच राहील असंही पवारांनी म्हटलंय. शिवाय, ‘एमआयएम’ला भाजपमधल्या काही जणांचं खतपाणी असल्याचा आरोपही यावेळी पवारांनी केलाय. 
 
त्यामुळे, आणखी एक नवीन गुगली टाकणाऱ्या पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? याचा अंदाजा लावण्याचे यत्न सुरू झालेत. 

भविष्यात काय असेल राष्ट्रवादीचा निर्णय... 
१९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळावर लढून ५८ जागा जिंकल्या होत्या. पक्ष स्थापनेनंतर राष्ट्रवादी लगेच सत्तेवरही आली. २००४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ८२ जागा मिळाल्या होत्या. स्थापनेपासूनचा राष्ट्रवादीचा हा सर्वात चांगला परफॉर्मन्स होता.

२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची घसरण होऊन त्यांच्या जागा ६२वर आल्या. मात्र राष्ट्रवादी सत्तेत कायम होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीची ४२ जागांवर घसरगुंडी झाली. शिवाय हातची सत्ताही गमवावी लागली. पक्षाच्या या घसरलेल्या कामगिरीवर अलिबाग इथल्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीत आता चर्चा होणार आहे. या बैठकीला खासदार आमदारांसह निवडक २०० जणांना निमंत्रित करण्यात आलंय. 

राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येऊ शकला नसला तरी सत्तेच्या जवळ राहण्यासाठी राष्ट्रवादीनं न मागताच भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. खरं तर जातीयवादी अशी टीका ज्या भाजपावर केली त्यांना पाठिंबा द्यायला राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विरोध होता. या पाठिंब्याबाबत आता पुढे काय भूमिका घ्यायची यावर राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर केल्या दिवसापासून राष्ट्रवादीवर प्रचंड टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादीची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला ठोस कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने या शिबिरात चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेतही आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षापासून पक्ष संघटनेतही बदल करण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या ४२ आमदारांवरही पक्षवाढीसाठी विशेष जबाबदारी टाकली जाण्याची शक्यता आहे.
 
स्थापनेपासून प्रथमच राष्ट्रवादी सत्तेबाहेर आहे. सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादीची जनमानसात प्रचंड बदनामी झाली आहे. भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष अशी राष्ट्रवादीची बदनामी झाली आहे. पक्षाला ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. ही प्रतिमा बदलून जनमानसात राष्ट्रवादी वाढवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर भविष्यकाळात असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.