बदलापूर : मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत.
बदलापूरमधल्या पहिल्या स्वायत्त मराठी विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी ना शिक्षणाची अट असेल, ना कुठला शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा परीक्षेचा ससेमिरा असेल. केवळ मराठी भाषा समृद्ध करण्याबरोबरच, मातृभाषेचं व्यावहारिक मूल्य वाढवण्याकरता वातावरण निर्माण करणं, हा या विद्यापीठाचा हेतू असणार आहे.
कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीला म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी या विद्यापीठाचं लोकार्पण होणार आहे. ज्येष्ठ समिक्षक डॉक्टर द. भि. कुलकर्णी यांची या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी निवड झाली आहे. बदलापूरमधल्या ग्रंथ सखा वाचनालयानं भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापन केली आहे.
वाचकाभिमुख उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या बदलापूर मधल्या ग्रंथसखा वाचनालयानं यात पुढाकार घेतला आणि काम सुरु केलं. आज मराठी शाळांची संख्या झपाट्यानं घटत आहे. अशा वेळी मराठी भाषा समृद्धीसाठी हे विद्यापीठ सुरु करत असल्याचं, ग्रंथ सखा वाचनालयाच्या विश्वस्तांनी सांगितलंय.
या विद्यापीठात अभ्यासक्रमासह राज्यभरातल्या वाचकांसाठी साहित्य आस्वाद शिबीर, दिवाळी अंकांच्या संपादकांसाठी कार्यशाळा, तसंच प्राचिन ते समकालीन साहित्यावर कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. तसंच ख्रिस्ती, बौद्ध, जैन अभ्यासाठी सुद्धा इथे स्वतंत्र दालनं तयार केली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.