धुळे : जिल्ह्यातील मुकटी गावाजवळ झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि सुमोचा हा अपघात होता, यात ५ जण गंभीर जखमी आहेत. महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघाताची घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित यंत्रणांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली. मात्र, यंत्रणेने कायमच दुर्लक्ष केल्याने भीषण अपघाताची घटना घडली. सुरत-नागपूर महामार्गावरील मुकटी येथे भीषण अपघात घडला. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत.
महामार्गावरचे खड्डे अपघाताला कारण ठरत असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवावे आणि अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना लवकरात लवकर मदत मिळावी, अशा मागण्या ग्रामस्थांच्या आहेत. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरत-नागपूर महामार्गावर रास्तारोको केला. त्यामुळे मुकटी परिसरात तणावाचं वातावरण पसरलं.
संबंधित अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिल्यानंतर महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु झाली आहे.दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.