अहमदनगर : वारकरी संप्रदायाचा गाभा असलेल्या गहिनीनाथांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. बीड, नगर, उस्मानाबाद आणि सोलापूर असे २५० किलोमीटरचा खडतर प्रवास करणा-या या दिंडीला १२५ वर्षांहून अधिक परंपरा आहे. यामुळेच माउलींच्या गुरूंचे गुरु असलेल्या गहीनिनाथांच्या या पालखीला मोठे महत्व आहे.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून निघणार-या या दिंडीला १२५ वर्षांची परंपरा आहे. कुठलाही राजमार्ग न धरता चार जिल्ह्यातून पारंपारिक रस्त्यांवरून मार्गक्रमण करणारी हि दिंडी काटाकुट्याच्या मार्गालाही जुमानत नाही. १० दिवसांत तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करणा-या या दिंडीतील वारकरी गहिनीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन आषाढीला पंढरपुरात दाखल होतात. विठूनामाच्या गजरात मोठ्या भक्ती भावाने दिंडी अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातून पंढरपूर कडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली.
जामखेड मध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. जामखेड मधील वळणावळणाच्या मार्गावरून हि दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी सर्व वारकरी विठूनामाचा गजर करत अभंग गात होते. असंख्य महिला आणि पुरुष वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. या गहीनिनाथांचे महत्व माउलींनी आपल्या १८ व्या अध्यायातून स्पष्ट केले आहे.
दरम्यान २५० किलोमीटरचा हा खडतर प्रवास करणा-या या वारक-यांना शासनाकडून कोणतीच सुविधा मिळत नसल्याने वारक-यांच्या मनात शासनाबद्दल नाराजी आहे. मात्र असं असलं तरी ऊन, वारा आणि पाऊस कसलीही पर्वा न करता वारकरी पंढरपूर कडे प्रस्थान करतायत. संत वामनभाऊंनी सुरु केलेल्या या दिंडी सोहळ्याला चारही जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे दिंडीची सुरुवात गहिनीनाथ महाराजांच्या दिंडीपासून झाल्याने या दिंडीला विशेष महत्व आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.