नागपूर : तापमानाने नागपुरात आणखी एक उच्चांक गाठला आहे. विदर्भात उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. रविवारी नागपुरात कमाल तापमान ४५.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. जे या मोसमातील विक्रमी ठरले. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.
विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या उष्णतेच्या लाटेखाली आहेत. नागपुरातही उन्हाचा जबर तडाखा जाणवत आहे. शनिवारी मोसमातील (४५.६ अंश सेल्सिअस) उच्चांक नोंदविल्यानंतर रविवारी ४५.७ अंश सेल्सिअस या आणखी एका विक्रमाची नोंद झाली.
विदर्भात मे महिना सर्वाधिक तापमानाचा मानला जातो. परंतु, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा कहर झपाट्याने वाढतो आहे.