चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ते 18 वयोगटातील दोन मुली अचनक बेपत्ता झाल्या. या प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक मोठं रॅकेटच उजेडात आलं असून, धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील चार सदस्यांपैकी तीन सदस्य महिला आहेत. या आरोपींच्या अटकेने विदर्भातून अचानक बेपत्ता झालेल्या अन्य काही मुलींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही हे गाव चंद्रपूर ते गोंदिया या रेल्वेमार्गावरील महत्वाचं स्टेशन... या गावातील दोन मुली घरी वादावादी झाल्याने रागावून घरातून निघून गेल्या. या मुली बसमध्ये बसून थेट उतरल्या त्या गोंदिया या मोठ्या शहरात... या शहरातील रेल्वेस्थानकावर त्यांनी आश्रय शोधला. मात्र, त्यांची कावरी-बावरी नजर पाहून या स्थानकावर असलेल्या एका महिलेने त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि इथून सुरु झाला या मुलींचा दुर्दैवी प्रवास...
दुसरीकडे, मुली बेपत्ता झाल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली. मात्र, यात फारसे यश आले नाही. इकडे विचारपूस करणाऱ्या महिलेने या मुलीना प्रथम नागपूरला आणि नंतर राजस्थानातील पावटा या जयपूर शहरातील उपनगरात नेले. काही दिवस एका घरात ठेवल्यावर या मुलींची चक्क विक्री करण्यात आली. आपल्या वयाहून अधिक वयाच्या इसमाशी एक लाख रुपयांत विक्री केली गेली.
दरम्यान, घाबरलेल्या मुलींनी केवळ एक मोबाईल कॉल करण्याचे धाडस दाखविले. या कॉलचा नेमका तपास करत सिंदेवाही पोलीस जयपुरात पोचले आणि हिराबाई, अनिता आणि नुरजहाँ यांच्यासह रामसिंग चौधरी अशा चौघांना मुलींना पळवून नेणे व विक्री करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.
सिंदेवाही पोलिसांनी ही आंतरराज्यीय टोळी पकडून विदर्भातील अशाच प्रकारे बेपत्ता असलेल्या मुलींच्या पालकांना आशेचा किरण दाखविला आहे. यात आणखी काही सूत्रधार व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येतील अशी आशा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.