रत्नागिरी : तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान... कारण तुमची यात फसवणूक होवू शकते. चिपळूण तालुक्यातल्या खेर्डी इथं असाच प्रकार घडला. मोबाईलऐवजी एकाला चक्क व्हिलचा साबणच बॉक्समधून आला.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी इथं राहणा-या युनूस किलानिया यांनी फ्लिपकार्ट वरून एक लिनोवा कंपनीचा मोबाईल खरेदी केला. ऑनलाईन ऑर्डर दिल्याप्रमाणे त्यांच्या घरी तीन दिवसांनी एक कुरियर आलं. त्या कुरिअरवाल्याकडे त्यांनी मोबाईलची असणारी किंमत 12 हजार रोख स्वरुपात दिले. आपल्याला नवीन मोबाईल मिळाला याच खुशीत यूनूस किलानिया यांनी जेव्हा कुरिअर फोडलं तेव्हा त्यामध्ये पाच रूपयांचा व्हीलचा साबण असल्याचं निदर्शनास आले.
किलानिया यांनी त्वरित कुरिअरवाल्याशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. मात्र तुम्ही कंपनीशी संपर्क साधा, असं कुरिअरवाल्यांनी युनूस किलानिया यांना सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी कंपनीशी संपर्क साधला मात्र तिकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर युनूस किलानिया यांनी हा सगळा प्रकार मीडियापर्यंत नेल्यावर कुरिअरवाल्यांनी आलेलं पार्सल परत मागवलं आणि युनूस किलानिया यांचे पैसेही परत देणार असून वरिष्ठांकडे यासंदर्भात पाठपुरावा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.