हिंगोली: मराठवाड्यात दुष्काळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र थांबण्याच नाव घेत नाही आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एकानं रेल्वे खाली येऊन जिवन संपलं तर दुसऱ्यानं औषध पिऊन मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीय.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात यंदाच्या हंगामात आवश्यक तेवढा पाऊस झाला नसल्यानं त्यांच्यावरही नापिकीचं संकट ओढावलंय. भेंडेगावच्या नामदेव संभाजी व्यवहारे या ३५ वर्षीय शेतकऱ्यानं दीड एकर शेतात सोयाबीन पेरल होतं. पण पावसानं दडी मारल्यानं त्याच्या शेतात फक्त सत्तर किलो एवढंच सोयाबीन पिकलं.
खरिपाच्या हंगामापासूनच गावात मजुरी मिळत नव्हती. त्यातच कारभारिन दुसऱ्यांदा गरोदर... त्यामुळं त्यासाठी लागणारा पैसा कुटून आणायचा या विवंचनेत ते अडकले होते. म्हातारी आजी, वयस्क आई, पत्नी आणि एक लहानसा चिमुकल्याची संपूर्ण जबाबदारी नामदेववर असतांना त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आपल जीवन संपवलं.
तर कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा इथल्या मुंजाजी पिराजी कंठाळे या ४२ वर्षीय शेतकऱ्यानं शेतात दोन एकर शेतामध्ये फक्त क्विंटलभर सोयाबीन पिकल्यानं मुलीचं लग्न कसं करायचं, बियाण्यासाठी घेतलेली उसनवारी कशी चुकती करायची या विवंचनेतून स्वतःच्या शेतात कीटक नाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना हिंगोलीच्या खाजगी दवाखान्यात भारती करण्यात आलं आहे.
मराठवाड्यातील नद्या विहिरी बोर कोरडी पडली असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. या गावाजवळून मोठा कालवा नांदेडकडे गेलाय. खरीपाची पिके वळत असतांना येलदरी धरणातून पाणी सोडण्याची येथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती. पण प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळंच आज ही स्थिती ओढावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची अशीच अवस्था असल्यानं शासनानं तत्काळ पावलं उचलत बळीराजाला आधार देण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती अजूनच बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, विदर्भासह संपूर्ण राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असून, २००४ ते २००८ दरम्यान ज्या प्रमाणात आत्महत्या झाल्यात तोच प्रकार परत एकदा होण्याची चिन्हं दिसत असल्याची खंत विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. राज्य सरकारनं ४ हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केंद्राकडे केली असली तरीही, प्रत्यक्षात मात्र गरज त्याही पेक्षा जास्त असल्याचं तिवारी म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.