राज्यातील धाडसी तरुणांसाठी पोलीस दलात सध्या नोकरीची संधी आहे. राज्याच्या पोलीस दलात कर्मचाऱ्यांची टंचाई असल्यामुळे या वर्षी पोलिस उपनिरीक्षकांची २५०० आणि पोलिसांच्या ६२ हजार रिक्त जागा येत्या दोन वर्षांत भरण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केली.
सांगली जिल्ह्य़ातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ३११ पोलिस उपनिरीक्षकांचा दुसरा दीक्षान्त सभारंभ गृहमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा सत्कारही करण्यात आला. तसेच ३११ पोलिस उपनिरीक्षकांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्याच्या पोलिस दलाकडे १५६५ पोलिस अधिकारी नव्याने मिळाले आहेत. आजवर नाशिक प्रशिक्षण केंद्राकडून ४ हजार अधिकारी पोलिस दलाला मिळाले आहेत. अजूनही पोलिस दलात २५०० पोलिस उपनिरीक्षकांची कमतरता आहे, तर राज्याच्या पोलिस दलात अजूनही ६२ हजार पोलिसांची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत ही पदे भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १२ हजार पोलिसांची भरती या वर्षी केली जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
गृहमंत्री म्हणाले, `नूतन पोलिस उपनिरीक्षकांना आता जनतेबरोबर मालमत्तेचेही रक्षण करावे लागणार आहे.कायद्यापुढे कोणीही मोठा किंवा लहान नाही हे समजून काम करावे लागेल. महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. राज्यातील महिला आणि मुलगी ही बारबालापेक्षा वीरबाला बनू इच्छिते आणि अशीच इच्छा मुलींनी बाळगली पाहिजे. आमच्या भगिनी कामाबाबत कुठेही कमी पडत नाहीत.` गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, `नव्या पोलिस अधिकाऱ्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यस्था राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. २१ व्या शतकात गुन्ह्य़ांचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे बदलत्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्याची गरज आहे. पोलिस दलात अधिकारी म्हणून काम करीत असताना शिपाई हा केंद्रिबदू मानून आणि जनताभिमुख काम करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे.` लाचलुचपत विभागाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कारवाईचे कौतुक करून गृहमंत्र्यांनी आता या कामात जनतेनेही पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. लाचलुचपत विभागाने आपल्या कारवाईत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पकडले आहे. त्यामुळे या विभागात सर्वानाच समान कायदा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.