मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर उतरल्यावर पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने आता स्थानकांवर पर्यटक मार्गदर्शकाची संकल्पना सुरु केली आहे. रेल्वे मंत्री, सुरेश प्रभू यांनी कणकवली स्टेशनवर १० पर्यटक मार्गदर्शकांचे स्वागत करून या सुविधेची सुरुवात केली.
स्थानिक ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक हे पर्यटकांसाठी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर पहिला संपर्क बिंदू असतात. हे ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक, स्थानिक भागातील असल्याने त्यांना तेथील सर्व पर्यटनस्थळे माहीत असतात. या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना पर्यटक मार्गदर्शक चे प्रशिक्षण पुरवले गेले तर पर्यटकांना दुहेरी फायदा होतो. या हेतूने त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रशिक्षित ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी ऑपरेटर, जे पर्यटक मार्गदर्शक म्हणून ऑपरेट करू शकेल, यांना बॅज वितरित केले.
ही संकल्पना कणकवलीनंतर गोव्यातील मडगाव स्टेशन येथे राबविण्यात आली असून तेथे ७३ ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना पर्यटक मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केले गेले. कोकण रेल्वेने ही संकल्पना आपल्या इतर मोठ्या स्टेशनवरही राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडक स्टेशनांवर ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना राज्य पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे पर्यटक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्यास प्रशिक्षण देत आहे आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ओळखपत्र दिले जाते. असे प्रशिक्षित ऑपरेटर योग्यरित्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्यास सक्षम असतात. कोकण रेलवेमार्गावर ही सुविधा अन्य स्टेशनांवरही सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.