नाशिक : डेन्मार्कच्या विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक राहुल एळींजे सध्या नाशिक जिल्ह्यात त्यांच्या आंतरराष्ट्रीय विवाहाने चांगलेच चर्चेत आहेत. बीएड एम एड करून केवळ आपल्या राज्यात शिक्षक न होता सातासमुद्रापारही संधी शोधल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे.
मूळचा मनमाडचा रहिवाशी असलेला आणि सध्या डेन्मार्कच्या आरुष विद्यापीठातील प्राध्यापक राहुल एलींजे आणि डेन्मार्कची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया दोघे विवाह बंधनात अडकले. राहुल एलींजे हा दहावीत इंग्रजी विषयात नापास झाला पुढे कठोर परिश्रमाने इंग्रजी विषयामध्ये प्रभुत्व मिळवत डेन्मार्कच्या कोपनहेगन इथल्या आरुष विद्यापीठात इंग्रजीचा प्राध्यापक झाला.
खडतर मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यानं हे यश संपादन केलं. विपश्यना आणि योगाची जोडही त्याच्या या मेहनतीला लाभली आणि त्यानं इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. विशेष म्हणजे डेन्मार्कमध्येच त्याची ओळख सिसिलायाशी झाली आणि ते मनमाड इथं विवाह बंधनात अडकले. भारतीय विवाह सोहळा पाहून सिसिलियाचं कुटुंबिय चांगलंच भारावून गेलं होतं. हा आंतरराष्ट्रीय मंगल सोहळा बघण्यासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली होती.