बोचऱ्या थंडीतली गरमागरम ‘मोगा पार्टी’!

बोचऱ्या थंडीचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतोय. अशाच थंडीत मित्रांच्या संगतीनं कोकणात रंगतेय मोगा पार्टी... 

Updated: Dec 30, 2014, 07:34 PM IST
बोचऱ्या थंडीतली गरमागरम ‘मोगा पार्टी’! title=

रत्नागिरी : बोचऱ्या थंडीचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेतोय. अशाच थंडीत मित्रांच्या संगतीनं कोकणात रंगतेय मोगा पार्टी... 

बोचरी थंडी... शेकोटयांची ऊब... मित्रांसह गप्पांचा फड आणि रात्री उशीरा रंगणारी मोगा पार्टी... कोकणातल्या शेतात सध्या अनेक जण या मोगा पार्टीचा आनंद लुटतायत... मोगा म्हणजे एका मडक्यात विविध खाद्य पदार्थ एकत्र करायचे आणि शेकोटीवर गरम करुन त्यावर ताव मारायचा...

मोगा पार्टीसाठी शाकाहारी आणि मांसाहारी मंडळींसाठी दोन वेगवेगळी मडकी घेतली जातात... त्या मडक्यात तळाला गावठी मीठ आणि ओव्याचं मिश्रण टाकलं जातं... मग पावट्याच्या शेंगा... भुईमुगाच्या शेंगा...मक्याची कणसं....रताळी असे विविध थर मडक्यात भरायचे आणि त्यावर मीठ आणि ओव्याचा शिडकावा करायचा... शाकाहारी मंडळींसाठी ही सारी तयारी... 

मांसाहारी प्रेमींसाठी अशाच पद्धतीनं मडक्यात अंडी आणि चिकनचे पीस खास केळीच्या पानात गुंडाळून ठेवले जातात. मडक्याचं तोंड झाडपाल्यांनी बंद केलं जातं. त्यानंतर ही मडकी शेतात उलटी ठेवून त्याच्या बोवती लाकडं, गवत रचून शेकोटी पेटवली जाते. 40 ते 45 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर खास तयार होतो हा खास खाद्यपदार्थ... आणि मग सगळेच जण या पदार्थावर ताव मारतात. 

कोकणात बोचऱ्या थंडीत मोगा पार्टी थंडीचा वेगळाच आनंद देऊन जातो. तुम्हालाही मोगा पार्टीचा आनंद लुटायचा असेल तर कोकणाची नक्की सैर करा... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.