जयेश जगड, अकोला : अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.
गेल्या निवडणुकीत पाचही पालिकांमध्ये कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता प्राप्त करता आली नव्हती. सध्या अकोट, मूर्तिजापूर, पातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.
बाळापुरात परिवर्तन आघाडीची तर तेल्हारामध्ये भाजप सत्तेवर आहे. यावेळी पाचही नगरपालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. सत्तेत असल्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची असणार आहे. तर गेल्या निवडणुकीत काहीच जादू न दाखवलेल्या शिवसेनेसाठी ही निवडणूक नव्यानं बांधणी करण्यासारखी ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळीची भीती यावेळीही कायमच आहे. राष्ट्रवादीची तीन पालिकेत सत्ता असल्यानं स्थिती उत्तम आहे पण ती टिकवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. भारिप-बहूजन महासंघाची काय भूमिका असेल याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल...
मनसेसह काही स्थानिक आघाड्यांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीची शक्यता लक्षात घेता अपक्षांनाही भाव येण्याची शक्यता आहे.
आता पालिकांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची परीक्षा अन् पक्षाच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू झालीय. त्यात कोण बाजी मारतं ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.