नागपूर : विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणानंतर नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. कारण इथल्या फॉरेन्सिक विभाग प्रमुखावर विद्यार्थ्यांकडून लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप एका पीडित तरुणीने केलाय. मानसिक त्रासासोबतच व्यवहारे यांनी त्यांच्यासोबत नाशिकला येणार का, अशी विचारणा केल्याचाही आरोप या विद्यार्थिनीनं केला आहे.
दोन दिवसांपूर्वी व्यवहारे यांच्या जाचामुळं एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता या नव्या आरोपांमुळं विद्यार्थिनी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
डॉ. व्यवहारे यांची विभागप्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी आता जोर धरतेय. त्यासाठी मार्ड आणि इतर दोन संघटनांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिलाय. या संतापाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय प्रशासनानं डॉ. व्यवहारेंकडून उप-अधिष्ठातापद काढून घेत आरोपांच्या तपासासाठी चौकशी समितीची घोषणा केलीय.
दोन दिवसांपूर्वी सुरु झालेला वाद आता चांगलाच चिघळलाय. व्यवहारे यांच्यावरील आरोपांची योग्यरित्या तपासणी होऊन कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.