मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगाव फाट्याजवळ, भीषण अपघातात ५ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला. चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने डॉक्टरांच्या टवेरा गाडीला धडक दिल्याची माहिती आहे. यावरून नाशिक विभागातील आरटीओ आणि वाहतुकीच्या शिस्तीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
नाशिक विभागातील काही आरटीओंना वाळूची नशा एवढी चढलीय की, त्यांना या नशेत रस्त्यावरील बेकायदेशीर वाहतूक दिसतंच नाहीय. मुंबई-नाशिक-धुळे-आग्रा महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला कोणतीही शिस्त राहिलेली नाहीय.
जड वाहनं नेहमीच वेगवान वाहनांच्या लेनमध्ये चालतात, यामुळे एसटीबस आणि प्रवाशांच्या गाड्यांना रस्त्यावर नाममोडी गाडी चालवत रस्ता काढावा लागतो, हे भीषण चित्र तुम्हाला महामार्गावर गेल्यावर कधीही दिसेल.
नाशिक विभागातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांवर तुम्हाला ओव्हरलोड वाळूंचे डंपर सहज दिसतील.
हे डंपर तसे दिवसाढवळ्या ओव्हरलोड वाहतूक करत असतात, पण म्हणतात ना चोराचं मन चोराला आतल्या आत प्रश्न विचारत असतं, म्हणून ही वाहतूक रात्री उशीरा होत असते.
रात्री उशीरा पंधरा-पंधरा, वीस-वीस वाळूंच्या डंपरचा हा तांडा रस्त्यावरून जात असतांना झोपेचं सोंग घेतलेल्या आरटीओच्या अधिकाऱ्यांना नजरेस पडत नाही.
मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड असलेले हे डंपर धुळे, जळगाव जिल्ह्यातून तसेच अमळनेर तालुक्यातील तापी नदीतून थेट नाशिक आणि मुंबईत येत असतात. ही वाळू एवढी ओली असते, की याचा पाण्याचा सडा रस्त्यावर नाशिकपर्यंत पडत असतो, यावरून विचार करा हे वजन किती असेल.
या वाहतुकीवर कारवाई करण्याचा प्रश्नचं नाहीय, कारण यावर कृपादृष्टी परिवहनसह महसूल आणि पोलिस खात्याचीही असल्याची उघड चर्चा आहे.
यात आठवड्याला लाखो रूपयांची उलाढाल आहे, मात्र या वाळूच्या नशेत आरटीओला कोण सांगणार की सर्वसामान्यांचा जीव जातोय, कोट्यवधी रूपयांचे रस्ते खराब होतायत, अमूल्य कधीही न मिळणारा माणसाचा जीव रस्त्यावर जातोय. तरीही
आरटीओला चढलेली लाखोंची वाळूची ही नशा कोण उतरवणार का? सरकार दरबारी कोणता लोकप्रतिनिधी ही कैफियत मांडणार का? किंवा हा प्रश्न निदान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून का पाहिला जात नाही, हे देखिल प्रश्न सर्वसामान्यांना पडतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.