नाशिक : नाशिकमध्ये विकास कामांच्या निधी वाटपावरून मनपा प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची धग सत्ताधारी मनसेला बसू लागलीय. सत्तेत राहून विकास कामं होत नसल्यानं मनसेचे गटनेते पदाचा राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर ज्यांच्याकडून जनतेची काम होत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लागावलाय.
मनसेचं महाराष्ट्रात एकमेव सत्ताकेंद्र असणाऱ्या नाशिकमध्ये पक्षात पुन्हा एकदा धुसफूस उफाळून आलीय. यावेळी कारण ठरलंय ते मनपा आयुक्तांनी विकास निधीला लावलेल्या कात्रीचं... निधी अभावी नगरसेवकांच्या कामांच्या फाईल मंजूरच होत नसल्याने सर्वच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरलीय. प्रशासनावर अंकुश नसल्याच कारण पुढे करत जो-तो मनसेला टार्गेट करतोय. विरोधकांचे वार झेलण्यात तीन वर्ष घालविल्यानंतर मनसेला आता अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय. सत्तेत राहून नागरिकांची पक्षाच्या नगरसेवकांची काम करता येत नसल्यानं पदाचा राजीनामा देण्याची तयारी गटनेत्यांनी केलीय.
मागील महिन्यात पार पडलेल्या महासभेत मनपा आयुक्तांनी सीमित केलेल्या विकास निधीत वाढ करून तो २० वरून ५० लाखांवर आणण्यात आला, मात्र अद्याप नगरसेवकांना निधी मिळत नसल्यानं नाराजीचा सुर उमटू लागलंय. त्या नगरसेवकांची समजूत घालून त्यांना बरोबर घेऊन काम करणं अपेक्षित असताना जे पदावर राहून काम करू शकत नसतील त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा खोचक सल्ला महापौरांनी दिलाय.
वसंत गीते आणि त्यांच्या समर्थकांचा राजीनामा आणि भाजप प्रवेशानंतर मनसे सावरत असतानाच विकास कामावरून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर यायला सुरवात झालीय. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.