हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एका नवविवाहितेनं विष पिऊन आत्महत्या केलीय. प्रेमविवाह करुनही पतीनं सोडून दिल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. सासरच्या मंडळींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आणि पोस्टमार्टम न करु देण्याचा पवित्रा मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतलाय.
कळमनुरी तालुक्यातील माळधावडा येथील सुमित्रा भिसे हिचा गावातीलच सुधाकर रिठ्ठे याच्याशी प्रेम जमल होत. दोघे ही एकाच जाती समुदायातील असून सुद्धा सुधाकरच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हतं. त्यामुळं या छोट्याश्या लव्हस्टोरीत अनंत अडचणी आल्या.
अनंत अडचणी असतांनासुद्धा आखाडा बाळापूर परिसरातील महादेव मंदिर येथे सुमित्राच लग्न सुधाकर बरोबर २२ नोव्हेबर २०१५ रोजी झालं. त्यानंतर सासरी सुमित्राचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला. ७० हजाराच्या हुंड्याची मागणी करून तिला घराबाहेर काढून देण्यात आलं. पती सुधाकरने सुद्धा तिची बाजू घेतली नाही. १६ फेब्रुवारीला रात्री सासरच्या मंडळींनी सुमित्राची हत्या केल्याचा आरोप होतोय.
सुमित्रानं ११ फेब्रुवारी रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतांना सुमित्राच्या आईच्या विंनंतीवरून तिला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण १६ फेब्रुवारीला पहाटे दीड वाजता सुमित्राचं निधन झालं.
पोलिसांनी मुख्य आरोपी सुधाकरला ही अटक केली आहे. सुमित्राचे सर्व नातेवाईक पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे सुमित्राच्या सासरच्या मंडळी विरोधात खुनाचाच गुन्हा दाखल करावा म्हणून चकरा मारतायेत.