निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प

निलोफर वादळामुळं कोकणवासियांच्या दिवाळीवर विरजण पडलंय. हवामानातील बदलामुळं भात, नाचणी पीक उध्वस्त झालंय. तर मासेमारी व्यवसायही ठप्प आहे.  

Updated: Oct 27, 2014, 10:54 PM IST
निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प  title=

रत्नागिरी: निलोफर वादळामुळं कोकणवासियांच्या दिवाळीवर विरजण पडलंय. हवामानातील बदलामुळं भात, नाचणी पीक उध्वस्त झालंय. तर मासेमारी व्यवसायही ठप्प आहे.  

सतत तीन दिवस पडत असलेला पाऊस आणि निलोफर वादळाचा फटका कोकणातल्या शेतकऱ्यांना असा बसलाय. अनेक भागात कापणीनंतर शेतात वाळत घातलेलं भात पीक पावसामुळं पूर्णपणे भिजलंय. तर वादळामुळं नाचणी पीक जमीनदोस्त झालंय. 

कोकणातल्या आंबा व्यावसायालाही हवामानातल्या बदलाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. पालवी फुटण्याचा काळात थंडी अपेक्षित असताना पावसाची हजेरी आणि वाढलेलं तापमान यामुळं आंबा हंगाम एक महिन्यानं पुढं सरकण्याची भीती निर्माण झालीय.  

तर वादळी वाऱ्यामुळं कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीही पूर्णत: ठप्प झालीय. कोकण किनारपट्टीसह अन्य राज्यातल्या बोटींनी कोकणच्या अनेक सुरक्षित बंदरात आसरा घेतलाय. निलोफर कोकण किनारपट्टीतून गुजरातच्या दिशेनं सरकलं असलं तरी वादळी वाऱ्यांचा तडाखा बसत असल्यानं मच्छिमारांनी खोल समुद्रात जावू नये असा इथारा प्रशासनानं दिलाय.

मात्र कोकणातला शेतकरी, आंबा व्यावसायिक आणि मच्छिमार अडचणीत सापडला असताना कोकणातून निवडून आलेले सर्वच राजकीय पक्षातले नेते सत्तेत अधिकाराची पदं मिळवण्यासाठी सध्या मुंबईत आहेत. त्यामुळं कोकणातले शेतकरी, आंबा व्यावसायिक, मच्छिमार आमच्याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न विचारतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.