पिंपरी, पुणे : येथे दोन दिवशी भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आणि गुंड शाह यांना प्रवेश दिल्यानंतर टीका होऊ लागली आहे. तसेच पालिका निवडणुकीच्यावेळी भाजपने गुंडांना प्रवेश दिला. त्यामुळे भाजप गुंडाचा पक्ष होत असल्याची टीक होऊ लागली. आज या टीकेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले, भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यावरही विरोधकांनी गुंडाचा पक्ष अशी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेला उत्तर देताना भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटलेय. त्याच बरोबर भाजपने आयात उमेदवारांना तिकीटे देऊन सत्ता आणली, अशी ओरड होऊ लागली होती. विरोधकांना पक्षात घेतल्याशिवाय पक्षच वाढणार नाही, असे मत गडकरी यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केले.
मतदारांची संख्या स्थिर आहे. त्यामुळे भाजपला जी मते पडणार आहेत ती विरोधकांचीच असतील. तेव्हा विरोधी पक्षातील उमेदवारास तिकीट दिल्यास कुठे बिघडते, असे गडकरी म्हणालेत. विरोधी पक्षातील लोकांना तिकीटे दिल्यामुळे भाजपमधील कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांची देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न यावेळी गडकरी यांनी केला. त्याचवेळी गुंडाना यापूर्वीही प्रवेश दिला आणि यापुढेही प्रवेश देऊ, असे गडकरी म्हणालेत.
एखाद्या नव्या सुनेचे आपण घरात स्वागत करतो त्या प्रमाणे बाहेरील उमेदवाराचे स्वागत करा, असे गडकरी यांनी म्हटले. जर पक्ष वाढला तरच तुम्हाला मान मिळेल पक्ष जर वाढला नाही तर तुम्हाला मान मिळणार नाही. तेव्हा नव्या उमेदवारांचे स्वागत करा. तुम्हालाही एक दिवस संधी दिली जाईल असे ते म्हणाले.
यशामुळे हुरळून जाऊ नका, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी दिला. यशामुळे जबाबदारी वाढते याची जाणीव ठेवा, असे गडकरी यांनी म्हटले. कुणाची पार्श्वभूमीवर काय आहे यावर सर्वकाही अवलंबून नाही तर आमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे गडकरी यांनी म्हटले.