रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे. सकाळी समुद्र किना-यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वेळणेश्वर इथल्या काही तरूणांना जाळ्यात काही तरी अडकल्याचं दिसलं. त्यांनी ते जाळं समुद्रातून किना-यावर खेचत आणलं तर त्यामध्ये कासव असल्याचं निदर्शनास आलं.
त्या कासवाचे दोन पाय जाळ्यात अडकले होते. त्याला त्यातून सुटता येत नव्हतं या तरूणांनी कासवाच्या पायातील जाळं बाजुला केलं आणि या कासवाला कुठे जखम वगैरे झालीय का याची पाहणी केली आणि त्यानंतर कासवाला पुन्हा समुद्रात सोडून दिलंय.
ऑलिव्ह रेडली या जातीचं हे कासव होतं. वेळणेश्वर इथल्या किनारपट्टीवर फिणा-या या तरूणांनी या कासवाला जीवदान दिलं आहे. कोकणच्या किनारपट्टीत मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या जगातील दुर्मिळ ऑलिव्ह रेडली जातीचं कासवं येत असतात, त्यामुळे हे कासव देखील सुरक्षित किनारा शोधत आलं असावं आणि येताना जाळ्यात अडकलं असावा असा अंदाज वर्तवला जातोय.