मुंबई : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जानकरांना निवडणूक आयोगानं नोटीस दिली आहे.
24 तासांमध्ये खुलासा करण्याचं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कारवाई करणार असल्याचा इशाराही आयोगानं दिला आहे.
देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज नगरपालिकेची १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. यानिमित्ताने २ दिवसांपूर्वी महादेव जानकर देसाईगंज येथे आले होते.
कार्यकर्त्यांसोबत बैठकीतूनच त्यांनी त्या भागातल्या निवडणूक निर्णय अधिका-यांना थेट फोन लावला आणि आपल्या समर्थक आघाडीला एकच निवडणूक चिन्ह देण्यासाठी फर्मावलं. एखादा मंत्री आदर्श आचारसंहिता जारी असताना अशा पद्धतीने फोन करून दबाव टाकू शकतो का असा प्रश्न आता विचारला जात आहे.