सातारा : रेशनिंगमध्ये अनेक ठिकाणी माफियाराज पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचं धान्य आणि साखर परस्पर बाजारात विकली जातेय, या माफियांना आळा घालण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून रेशनिंग कार्ड थेट आधारकार्डला लिंक अप करण्याचं काम सुरू आहे.
तुम्ही गॅस एजन्सीला तुमचा आधार क्रमांक दिला असेल, तर तुमचं रेशनिंग कार्ड सर्वात आधी लिंक अप होईल, आणि यापुढे तुमचं रेशनिंगचं सर्व अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
ही पद्धत राज्यात वेगाने लागू झाल्यास, रेशनिंग माफियांना मोठ्या प्रमाणात चाप लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात मागील वर्षभरात जिल्ह्यात नव्याने एक लाख शिधापत्रिकाधारक वाढले आहेत. सध्या रेशनकार्डचे आधारकार्डशी लिंकअप करण्याचे काम सुरू आहे.
प्रत्येक शासकीय विभागावर विविध ग्राहकांची आधारकार्ड मिळविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यात गॅस एजन्सीकडे आधारकार्ड क्रमांक नोंद असलेल्या ग्राहकांचे रेशनकार्ड प्रथम लिंकअप होणार आहे.
या माध्यमातून रेशनवर मिळणाऱ्या वस्तूंचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
सध्या ज्या गॅस ग्राहकांचे खाते आधार व बॅंक खात्याशी लिंकअप आहे, त्यांना अनुदान दिले जाते. उर्वरितांना शासकीय सवलतीच्या दरानेच सिलिंडर दिले जात आहे.
सध्या शिधापत्रिकांचे आधारकार्डशी लिंकअप करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पुरवठा विभागासह प्रत्येक विभागावर आपापल्या ग्राहकांचा आधारकार्ड क्रमांक मिळविण्याची जबाबदार सोपविण्यात आलेली आहे. त्यात प्रथम गॅस एजन्सीकडे आधारकार्ड क्रमांकाची नोंद असलेल्या ग्राहकांचे रेशनकार्ड लिंकअप होणार आहे.
गॅस एजन्सीकडे सुमारे 70 टक्के ग्राहकांचा आधारकार्ड क्रमांक आहे. शिधापत्रिकांचे संगणकीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत तीन लाख शिधापत्रिकांचा डाटा तपासून पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात साडेसहा लाख शिधापत्रिका आहेत.
गेल्या वर्षभरात विविध कारणांनी एक लाख शिधापत्रिकांची नव्याने भर पडली असून आता सात लाख आठ हजार शिधापत्रिका झाल्या आहेत.
या सर्व शिधापत्रिकांचे आधारकार्ड क्रमांकाशी लिंकअप केले जाणार आहे. त्यानंतर रेशनवर मिळणाऱ्या साखर, गहू, तांदूळ, डाळ, गोडेतेल आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मिळणारे शासकीय अनुदान त्या-त्या शिधापत्रिकाधारकाच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.