रत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी

मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत. 

Updated: Dec 9, 2015, 03:56 PM IST
रत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी title=

रत्नागिरी : मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत. 

गावातील तरुणांनी वाचवला अनेकांचा जीव
रत्नागिरीच्या जयगड येथील जिंदाल कंपनीतून होणाऱ्या बेकायदा अवजड वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं आज सात जणांचे बळी घेतले आहेत तर तीसहून अधिक लोक जखमी आहेत. क्षमेतेपेक्षा कितीतरी अधिक कोळसा भरलेला हा ट्रक एसटी बसवर जाऊन धडकल्याने आत अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढायला तब्बल अडीच तासहून अधिक कालावधी लागला. प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा कुचकामी ठरली असताना - हातखंबा - निवळी गावातील तरुणांनी आज अनेकांचे प्राण वाचवले.  

अधिक वाचा - ट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा


घटनास्थळावरून

कसा झाला हा अपघात... 
रत्नागिरीच्या  जिंदालकंपनीकडून बेकायदेशीररित्या क्षमतेपेक्षा अधिक कोळसा भरलेल्या ट्रकच्या चालकाला मुंबई गोवा महामार्गावर निवळी-बावनदी दरम्यानच्या अपघात प्रवण वळणावर आपल्या ट्रकवर नियंत्रण ठेवता आलं नाही. या ट्रकनं चिपळूणकडून येणाऱ्या एका एसटी बसला जोरदार धडक देत हे बस रस्त्याच्या बाजूच्या दरीपर्यंत ढकलत नेली. ही टक्कर इतकी भयानक होती की या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बस- ट्रकच्या खाली चेपली गेल्याने या अपघातात एसटीच्या चालकासह आठ ते दहा जण या ट्रकखाली एसटीमध्ये चेपले गेले होते. या स्थितीत अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरत असताना हातखंबा परिसरातील जिगरबाज तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालत अपघातग्रस्त वहानामध्ये प्रवेश करत जखमींना बाहेर काढले.


घटनास्थळावरून

आपत्कालीन यंत्रणेचा पर्दाफाश
२५ टनाहून अधिक कोळसा भरलेल्या या ट्रकच्या वेगामुळे एसटीचा  निम्याहून अधिक भाग चेपला गेला होता. अपघातग्रस्त एसटीचा चालक तब्बल एक तासाहून अधिक काळ ड्रायव्हिंग सीटमध्ये अर्धवट अवस्थेत अडकून पडला होता. तर आतील दहाहून अधिक प्रवासी हे ट्रकखाली चेंगरलेल्या अवस्थेत होते. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्याने चार क्रेनचा वापर करून ही ट्रक खाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढायला तीन तासांहून अधिक वेळ लागला. मुंबई गोवा महामार्गावरील आजच्या अपघाताने मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या आपत्कालीन यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.