रत्नागिरी : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत शिवसेना उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्हा बँकेत तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप सहकार पँनलच्या माध्यमातून एकत्र आलेत. तर सहकार पॅनलचा जागांचा फाँर्म्युला न पटल्यामुळे शिवसेनेने सर्व २१ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकित चुरस पाहायला मिळत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या चर्चेत आहे ती बँकेच्या निवडणुकीमुळे. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना -भाजप इथं मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे.
जिल्हा बँकेवरही सहकार पँनलच्या माध्यमातून राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे. विद्यमान २७ संचालक मंडळामध्येही राष्ट्रवादीचे १९ संचालक आहेत. तर भाजप २ आणि काँग्रेसचे ५ आणि शिवसेनेचा १ सदस्य आहे. पण यावेळी संचालक मंडळाच्या ६ जागा कमी झाल्याने २७ ऐवजी २१ जणांचं असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार पँनलच्या माध्यमातून राष्ट्रवादीने प्रयत्न सुरु केले होते.
काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेबरोबर जागावाटपाचा प्रस्ताव ठेवला होता.. पण शिवसेनेला हा प्रस्ताव न पटल्याने सहकार पँनलने आपले सर्व २१ उमेदवार उभे केलेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत.
भाजपाकडून या युतीचं समर्थन करण्यात आलय. कोकणात सहकार रुजावा यासाठी ही युती केलीय. त्यामुळे शिवसेनेशी कुठलीही बोलणी या संदर्भात झाली नसल्याचं भाजपकडून सष्ट करण्यात आलय. दरम्यान या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळून आलाय.
माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी जिल्हा बँकेतील आपल्याच पक्षाच्या संचालकांवर भ्रष्ट्राचाराचा आरोप केलाय. नोकरभरती तसंच कर्ज प्रकरणांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यतील नेते डॉ. तानाजीराव चोरगे यांच्यावर टीका केलीय.
रमेश कदम याचे हे आरोप बिनबुडाचे असल्याच सांगत डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कदम यांना पुरावे सादर करण्याच आव्हान दिलय. राज्य आणि देशातल्या राजकारणात या प्रमुख पक्षांच्या परस्पर विरोधी भुमिका आहेत. मात्र रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप एकत्र आल्याने या निवडणुकीतील रंगत वाढलीय.. तर दुसरीकडे शिवसेना स्वतंत्र लढत असल्याने आणि राष्ट्रवादीच्याच पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या संचालकांवर भ्रष्ट्राचाराचा आरोप केल्याने सहकार पँनल समोर आव्हान निर्माण झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.