नाशिक : महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला समृद्धी महामार्ग वादात अडकतोय. शेतक-यांचा या महामार्गाला विरोध वाढत चालला आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय.
गेल्या तीन चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील शिवडीसह परिसरातल्या गावांमध्ये सरकारी अधिका-यांच्या माध्यमातून मोजणी केली जातेय. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध पोलीस बळाद्वारे हाणून पाडला जात असून आंदोलक शेतक-यांना ताब्यात घेतलं जात आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिका-यांची भेट घेऊन मोजणी थांबवून शेतकऱ्यांच्या जमिनींना अभय देण्याची मागणी केली आहे. मात्र जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढचे चार पाच दिवस सिन्नर तालुक्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.