नागपूर : मोदी अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेवर ठाम असताना फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आमची वेगळ्या विदर्भाची भूमिका कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा इशारा हा मुंबईबाबत चाललेल्या अपप्रचाराबाबत होता. छोट्या राज्यांबदद्लची आमची भूमिका आजही कायम आहे. ती मोदींना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज धुळ्यातील दोंडाईचा येथे अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे तुकडे करणारा अजुनही जन्माला आला नाही. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा मोदी यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेकडून सातत्यानं भाजपवर वेगळा विदर्भ आणि वेगळी मुंबई करणार असल्याचा आरोप होतोय. या आरोपावरच मोदींनी प्रत्युत्तर दिलं. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण असल्याचं मोदी म्हणाले.
दरम्यान, छोट्या राज्यांविषयी भाजपची नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका राहिलीय. भाजपच्या विदर्भातील नेत्यांनी सातत्यानं वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली होती. आता मात्र मोदींनी अखंड महाराष्ट्राची घोषणा केल्यानं भाजपचे विदर्भवादी नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता त्यांची भूमिका काय असेल हे पाहाणं औत्युक्याचं होतं. मात्र, महाष्ट्रातील भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आलेय.
आमची वेगळ्या विदर्भाची भूमिका कायम आहे. छोट्या राज्यांबदद्लची आमची भूमिका आजही कायम आहे. ती मोदींना माहीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने त्यांनी मोदीनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.