नागपूर : शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
विधान परिषदेत कांग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ अनुक्रमे २७ आणि २१ आहे. तर सेना भाजपचे संख्याबळ हे जेमतेम २० पर्यंत आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकपणापुढे, सत्ताधारी शिवसेना - भाजपला बॅकफूटवर जावं लागतंय.
एकनाथ खड़से आणि एकदोन मंत्र्यांचा अपवाद वगळता, इतरांना सभागृहात उत्तरे देण्याचा अनुभव नाही. त्यातच सभागृहाचे कामकाज, सरकारी नियम आणि कार्यपद्धती याची खडानखडा माहिती असलेल्या ज्येष्ठ आमदारांची फौज विरोधकांकडे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास असू दे, नाही तर चर्चा असू दे, विरोधी बाकावरचे सदस्य मंत्र्यांना कोंडीत पकडत असल्याचं चित्र सध्या दिसतंय.
विधान परिषदेतला विरोधकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता, भाजपने एकनाथ खडसे यांना सभागृह नेता बनवलंय. अडीअडचणीच्या वेळी विधान परिषदेत सरकारला सांभाळून घेण्याची मुख्य जबाबदारी खडसे आणि इतर अनुभवी आमदारांवर येऊन पडलीय.
विधान परिषदमध्ये संख्याबळाअभावी सरकारला बहुमताचा आनंद लूटता येत नाही. उलट विरोधकांच्या तोफखान्याला तोंड देताना सरकारचीच दमछाक होतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.