ठाणे : भिवंडीत रिक्षाचालकाच्या मारहाणीत बस चालकाचा मृत्यू झाला. त्याविरोधात आज ठाण्यात एसटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय.
पी.एस.गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्यामुळे आज ठाण्यातील दोन्ही आगरामधील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीये. भिवंडी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे ठाण्यातील प्रवाशांचे चांगलेच हाल होतायत.
भिवंडीत एसटी डेपोतील चालक प्रभाकर गायकवाड यांना एका रिक्षाचालकानं केलेल्या मारहाणीत गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री ड्युटीवर होते. डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.
याच रागातून रिक्षाचालकाने गायकवाड यांना जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि आजुबाजुचे रिक्षाचालकही मदतीला आले. सर्व रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली. या घटनेची तक्रार करण्यासाठी गायकवाड पोलिस स्थानकात गेले असता तिथेच चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.