एड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत

Updated: Feb 4, 2015, 10:05 AM IST
एड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत title=

एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला बहिष्कृत करण्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली इथं उघडकीस आली आहे.. गावात राहाण्यासाठी हक्काची जागा नसल्यानं सध्या या महिलेचं चक्क स्मशानभूमीत वास्तव करावं लागतंय.  

कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली गावातील या महिलेची ही धक्कादायक कहाणी आहे. हक्काची जागा नसल्यानं गावात राहाण्यासाठी ग्रामपंचायतीनं तात्पुरती जागा उपलब्ध करुन द्यावी यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला. पण आपली कोणी दखल घेत नसल्याचं पाहून या महिलेनं चक्क गावच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभुमीतच गुऱ्हाा ढोऱ्हांसह राहण्यास सुरवात केली. या पीडित महिलेच्या पतीचं दोन वर्षापूर्वीी एड्समुळे निधन झालं. तेव्हापासून ह्या महिलेला गावात राहण्यासाठी जागा देण्यास टाळाटाळ सुरु झाली. इतकंच काय नळावर पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर तिला चुकीची वागणूक देण्यात आली.

गावात अनेक बाबतीत त्रास होऊ लागला म्हणून तिला आपल्या मुलीला मामाकडे पाठवावं लागलं. गावच्या गायरानात तात्पुरतं शेड मारुन राहण्याचा प्रयत्न केला. पण ती झोपडीही उध्वस्त करण्यात आली. त्यामुळं जायचे कुठं असा प्रश्न तिच्यासमोर पडला. त्यातूनच तिनं तहसिलदार, जिल्हाधिकारी आदी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविले. पण कुठंच न्याय मिळाला नाही.

तिला स्मशानभूमीत राहावं लागतय असं समजल्यावर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ गावाला भेट दिली आणि तिला महिला वस्तीगृहात राहाण्याचा सल्ला दिला. पण ३ ढोरं आणि संसाराचा पसारा घेवून वसतीगृहात कसं जाणार असा प्रश्न तिनं विचारलाय. गावचे ग्रामपंचायत सरपंचानी आपण नियमानुसार मागणी असेल तरच मदत करु असं म्हटलंय.

ह्या पिडीत महिलेची ही आवस्था पाहून गावातीलच एका व्यक्तीनं शेतात तात्पुरती शेड मारुन राहण्याला परवानगी दिली आहे. पण तिला हक्काची जागा आणि हक्काचं घऱं मिळवून देण्यासाठी गावकरी किंवा कोल्हापूर जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार का हा खरा कळीचा मुद्दा आहे.

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.