गोरेगाव : ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही रिक्षाचालकांची दहशत वाढत चालल्याची घटना गोरगावमध्ये घड़लीय.
रिक्षा चालकाच्या छेडछाडीला घाबरून एका सोळा वर्षांच्या मुलीनं चालत्या रिक्षातून खाली उडी घेतली. यात मुलीचा दात तुटला असून ती जखमी झाली आहे.
आरे कॉलनीत राहणारी ही तरुणी पहाटे साडे पाच वाजता दादरवरून गोरेगाव स्टेशनला आली. मात्र जवळ पैसे नसल्यामुळं घराकडं पायी चालत निघाली. रस्त्यात एका रिक्षावाल्यानं आरे कॉलनीच्या दिशेनंच जात असल्याचं सांगत
या तरुणीला आपल्या रिक्षात बसवलं. काही अंतर गेल्यानंतर मात्र हा रिक्षाचालक तरुणीसोबत अश्लील चाळे करु लागला. त्यामुळं घाबरलेल्या तरुणीनं स्वत:ला वाचवण्यासाठी धावत्या रिक्षातून बाहेर उडी घेतली. यात ती जखमी झाली.
रिक्षावाला मात्र त्याठिकाणाहून फरार झाला. अशा प्रकारांमुळं मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तर रिक्षाचालकांना परवाना देतांना त्यांची पार्श्वभूमीही तपासण्यात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.