मुंबई : महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC ने अगदी स्वस्तात आणि बेस्टच्या वातानुकुलित बसच्या माध्यमातून मुंबई दर्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र वारंवार बंद पडणा-या वातानुकुलित किंगलॉग बसेसच मुंबई दर्शनाकरता देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यंटकांचं मुंबई दर्शन विनासायास पार पडेल अशी आशा करुया.
सीएसटी स्थानकाच्या बाहेर बेस्ट बसच्या आवारात मुख्यमत्र्यांनी एमटीडीसीच्या मुंबई दर्शन सेवेचं उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर स्वतः मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी बसमधून प्रवास केला. या सेवेमध्ये बसचे दोन मार्ग आखण्यात आले आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुंबई दर्शनचं तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहे. माणशी ४९९ आणि ७२५ रुपये, असा हा दर आहे. मात्र मुंबई दर्शनासाठी बेस्टने ज्या बसेस निवडल्या आहेत त्यावर मात्र शंका व्यक्त केली जात आहे. कारण वादग्रस्त आणि खार्चिक ठरलेल्या किंगलॉग बसेस बेस्टनं मुंबई दर्शनासाठी दिल्या आहेत. तेव्हा या वातानुकिलित बसेस पर्यंटकांचा विचका करणार नाहीत ना याबद्द्ल शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र बेस्टने हे आरोप फेटाळले आहेत.
मुंबईत पर्यंटकांसाठी अशी विविध पर्यटन स्थळं एकाच फेरीत बघण्याची सोय राज्य शासन किंवा पालिकेतर्फे याआधी उपलब्ध नव्हती. मात्र आता पर्यटक खेचण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई दर्शनची ही स्वस्तातली सेवा उपलब्ध करुन दिली आहे. आता महामंडळ याची जाहिरात किती करते, त्यावर या सेवेचे यश अवलंबून असणार आहे.
-मुंबई दर्शनसाठी सीएसटी आणि दादरहून बस निघणार
-सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी मुंबई दर्शनची वेळ
-मुंबई दर्शन फेरीत ५० पेक्षा जास्त ठिकाणं बघता येणार
-मुंबई दर्शनमध्ये सिद्धीविनायक दर्शनही घेता येणार
-सध्या मुंबई दर्शन सेवा शनिवार, रविवार उपलब्ध असेल
-ऑक्टोबरनंतर दर दिवशी मुंबई दर्शन उपलब्ध असणार
-बेस्टच्या वातानुकूलित बसमधून मुंबई दर्शन करता येणार
-मुंबई दर्शनमध्ये ऐतिहासिक वास्तू, संस्था, मंदिरे,
- महत्त्वाची पर्यटन स्थळं, बॉलीवुड कलाकारांच्या निवासस्थानांचा समावेश