www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डान्सबार बंदीवरून आता सत्ताधारी आघाडीमध्येच ब्लेमगेम सुरू झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अखत्यारीतील विधी व न्याय खात्यावरच तोफ डागलीय. डान्स बार बंदीचा कायदा करताना विधी व न्याय खात्याकडून त्रुटी राहिल्या, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. त्यामुळं आता डान्सबार बंदीवरून आघाडीतच महाभारत रंगलेय....
डान्सबार बंदीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कारणमिमांसा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काहीशी अशी केली... या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली असताना त्यांनी काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर.आर. पाटलांनी डान्स बार बंदीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. असं असताना विधी आणि न्याय खात्याकडून काही त्रुटी राहिल्याचं अजितदादा म्हणतायत. म्हणूनच सुप्रीम कोर्टात डान्स बार बंदीचा निर्णय टिकला नाही, असं राष्ट्रवादीच्या विद्यार्थी परिषदेत बोलताना त्यांनी सांगून टाकलं. हे खातं थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान केल्याचं मानलं जातंय. मुख्यमंत्र्यांवरील या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. सरकारमध्ये राहून दुस-या खात्याच्या कामावर टीका करणं योग्य नाही, अशी चपराक माणिकरावांनी लगावली.
राज्यात डान्स बार बंदी करण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीतच एकमेकांवर खापर फोडण्याचे उद्योग सुरू झालेत. हा सामना आणखी कसा रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष आता लागलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.