www.24taas.com,झी मीडीया,मुंबई
मुंबई महापालिकेतील जिमखान्यात गैरव्यवहार झाल्याचं पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झालंय. जिमखान्यात गैरव्यवहार करणा-या अधिका-यांवर कारवाई करत पालिका जिमखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असताना गैरव्यवहारात सापडलेले अधिकारीच जिमखान्याच्या पैशावर पालिका आयुक्तांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत.
मुंबई महापालिका जिमखान्यात तत्कालिन मुख्य सचिव श्रीकांत कामतेकर, खजिनदार मोहन पाटील, सचिव विजय पोखरकर यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका पालिकेच्या लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आलाय. आझाद मैदान, शिवाजी पार्क इथं जिमखान्यासाठी वस्तू खरेदी केल्याची खोटी बिलं दिली. मात्र जिमखान्यात वस्तू सोडाच कोणतीही साधनं नसल्याने शिवाजी पार्कचा जिमखानाच मोडकळीस आल्याचं झी २४ तासनं उघडकीस आणलं होतं.
खेळाडूंचे भत्ते, फिक्स डिपॉझिटची मुदतपूर्व रक्कम, जाहिरातींचं मिळणारं उत्पन्नही जिमखानाच्या कार्यकारणी समोर सादर न केल्यानं लेखा परिक्षण अहवालात गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस झालं. जिमखान्यातील गैरव्यवहार करणा-यां अधिका-यावर कारवाई करत पालिका जिमखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असताना गैरव्यवहार करणारे अधिकारीच पालिका आयुक्तांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत.
पालिकेच्या लेखापरिक्षण अहवालानुसार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त असिम गुप्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र हे अधिकारी न्यायालयात गेल्याने पालिका आयुक्त बोलण्यास तयार नाहीत. गैरव्यवहार करणा-या अधिका-यांची माहिती घेऊन बोलेन असं उत्तर मुंबईच्या महापौरांनी दिलंय.
मुंबई महापालिकेच्या जिमखान्याची १९२६ ला स्थापना झालीय. या स्थापनेपासून जिमखान्याचं रजिस्ट्रेशन नसतानाही जिमखान्याच अनुदान गैरव्यवहार करणारी कमिटी लाटत आहे.