मुंबई: मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय.
त्यामुळं रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था झाली आहे. मुंबईत आतापर्यंत डेंग्यूचे ६२० रुग्ण आढळले असून त्यापैकी सात जणांना बळी गेलाय.
पावसाळा संपल्यापासून ते थंडी सुरू होण्यापूर्वीचा काळ डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी अधिक पोषक आहे. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यातच होत असल्यानं असे पाणी साठण्यासाठी थोडा जरी वाव मिळाला. तर तिथे तत्काळ अळ्यांची निर्मिती होईल, असं पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख डॉ. राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.
हे टाळा
- घरात पिंपातील पाणी दररोज साठवून ठेवू नका. कुंड्या तसेच घरात शोभेची झाडे, फेंगशुई प्लाण्टखाली पाणी साचू देऊ नका. जुने टायर, बाटल्या, फ्रीजच्या मागील बाजूस पाणी साठू देऊ नका. यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन घरच्या घरीच डेंग्यूची पैदास होते.
पालिका जनजागृतीवर भर देणार
- डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे पालिकेने आता जनजागृतीवर भर देण्याचे ठरवले आहे. घरामध्ये स्वच्छता कशी राखावी याबाबत पथनाट्य, वर्तमानपत्रातील जाहिराती, शॉर्टफिल्म यातून घराघरातून जनजागृती करावी असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
तापाचे रुग्ण वाढले
- दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात तापाचे रुग्ण वाढले असल्याची माहिती डॉ. पारकर यांनी दिली. साधा ताप आला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, तपासणी करावी, ताप अंगावर काढू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.