www.24taas.com, मुंबई
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात मुंब्र्यात बंद पुकारण्यात आलाय. बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवतोय.
या बंदमुळे आज मुंब्रा परिसरातले व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. बाजारपेठेतली कोणतीही दुकानं उघडण्यात आलेली नाहीत. ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. रिक्षा चालकही बंदमध्ये सहभागी झालेत. मुंब्र्यातल्या शाळाही बंद ठेवण्यात आल्यात.
महत्त्वाचं म्हणजे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत रडारड करुन सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नातल्या जितेंद्र आव्हाड आज बंदसाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं. बदनामीच्या कटात अडकवल्याचं सांगून कालच्या सभेत आव्हाडांनी गळा काढला होता. आज मुंब्र्यातल्या नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज ते रस्त्यावर उतरले होते. नागरिकांच्या बंदला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय.
अनधिकृत बांधकामांना प्रशासन आशीर्वाद देतंय, असा आरोप करायचा आणि दुसरीकडे कारवाई करणाऱ्या महापालिकेविरोधात बंद पुकारायचा ही दुटप्पी भूमिका आता नागरिकांच्याही लक्षात आलीय. त्यामुळेच नागरिकांनी राजकीय पक्षांच्या या दुटप्पीपवर नाराजी व्यक्त केलीय.