www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाची चर्चा रखडली असताना, राष्ट्रवादीने मात्र लोकसभेचे आपले उमेदवार निश्चित करायला सुरूवात केलीय. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी आणि सोमवारी लागोपाठ दोन दिवस मुंबईत बैठका घेणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीचा 26-22 जागावाटप फॉर्म्युला काँग्रेसला मान्य नसला तरी याच आधारावर राष्ट्रवादीने आपली निवडणुकीची तयारी सुरू केलीय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झालेत... 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढवल्या होत्या. याच फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादीने 2014 च्या लोकसभा निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दोन्ही पक्षात जागावाटपाची एकही बैठक झाली नसली तरी राष्ट्रवादीने मागचाच 26-22 हा फॉर्म्युला स्वतःच जाहीर केलाय. काँग्रेसला मात्र हा फॉर्म्युला मान्य नाही. राष्ट्रवादीला 22 ऐवजी 19 जागा सोडण्याची भाषा काँग्रेसकडून केली जातेय.
मागील फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीच्या वतीनं 22 जागांवरील उमेदवार लवकरच निश्चित केले जाणार आहेत. त्यासाठी येत्या रविवारी आणि सोमवारी शरद पवारांनी मुंबईत पक्षाची बैठक बोलवलीय. सध्या राष्ट्रवादीकडे जळगाव, रावेर, बुलढाणा, अमरावती, भंडारा-गोंदिया, हिंगोली, परभणी, दिंडोरी, नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पूर्व, मावळ, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, माढा, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले हे 22 मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांची काँग्रेसबरोबर अदलाबदल होणार आहे.
जागावाटपाची चर्चा झालेली नसताना, राष्ट्रवादीने 22 मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी सुरू केलेली तयारी म्हणजे काँग्रेसवर एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसतो. जागा वाटपाची चर्चा लवकर करण्याच्या राष्ट्रवादीच्या मागणीकडे काँग्रेसने लक्ष न दिल्यानं पक्षानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.