www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जागोजागी अनेक बॅंकांची एटीएम दिसत असताना आता त्यात भर पडणार आहे ती टपाल विभागाच्या एटीएमची. दिल्ली आणि चेन्नईनंतर टपाल खात्याने राज्यातील पहिले एटीएम सेंटर गुरूवारी चेंबूरमध्ये सुरू केले. टपाल विभागाच्या सचिव पद्मिनी गोपीनाथ यांच्या हस्ते या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.
टपाल खात्याचे एटीएम नसल्याने खातेदार खासगी बँकांकडे वळत होते. त्यामुळे ग्राहकांना टपाल विभागाकडून अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने टपाल विभागाकडून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एटीएम सेंटरची उभारणी आणि कोअर बँकिंग सोल्युशन्स हे त्यापैकी दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यानुसार देशातील टपाल खात्याचे पहिले एटीएम दिल्लीनंतर चेन्नईत उघडण्यात आले.
गेल्या काही वर्षांत खासगी बँकांकडून ग्राहकांना अधिक सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र, टपाल खाते मागे राहिले होते. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील पहिले एटीएम चेंबूरच्या मुख्य टपाल कार्यालयात उघडण्यात आले आहे. या एटीएमचा उपयोग पोस्टात बचत खाते असलेल्या ग्राहकांना होणार आहे. सध्या ही सेवा पोस्टातील बचत खातेदारांसाठीच असून येत्या वर्षभरात इतर बँकांसोबत करार झाल्यानंतर ही सेवा सर्वांसाठी खुली होईल.
येत्या वर्षभरात टपाल खात्याकडून संपूर्ण देशात एक हजार एटीएम सेंटर उभी राहणार आहेत. यात महाराष्ट्रातील ७५ एटीएम सेंटरचा समावेश असून पुणे ११, औरंगाबाद १७, गोवा १४, नागपूर १६ आणि मुंबईत १७ एटीएम सुरू होणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.